Mumbai News : आंबेशीव खुर्दच्या ग्रामपंचायत सदस्यांवर शिवसैनिकांचा हल्ला, भाजप नेते राज्यपालांना भेटणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महानगरपालिका असो अथवा राज्य सरकारमधील गैरकारभार भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या कागदपत्रांच्या आधारे सातत्याने आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर टीका करत असतात. मागील काही दिवसांपासून सोमैय्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. तर, दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची हकालपट्टी करण्यासाठी राज्यपालांना भेटणार असल्याचे त्यांनी म्हटलं होते. त्यातच, आज किरीट सोमैय्या राज्यपालांची भेट घेणार आहेत.

ट्विट करुन सोमैय्या यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, “आंबेशीव खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सर्वच ९ उमेदवार निवडून आले, म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये ४ भाजप कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज ५ वाजता, त्यांच्या परिवारासोबत मी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहे.”

प्रताप सरनाईकांविरुद्ध केलं आंदोलन
ठाण्यातील विहांग गार्डन चे बी १ आणि बी २ बिल्डिंगचे १३ मजले अनधिकृत असल्याचा दावा किरीट सोमैय्या यांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी सोमैय्या यांनी ठाणे महानगरपालिका आणि ठाणे पोलिसांकडे केली होती. मात्र, कारवाई होत नसल्याचे पाहून ठाणे महानगरपालिकेसमोर भाजप नेते किरीट सोमैय्या, आमदार निरंजन डावखरे आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. तेव्हा सरनाईक यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.