‘राणेंची शेवटची फडफड सुरु झाली’ : रामदास कदम यांची राणेंवर बोचरी टीका

पंढरपूर : पोलीसनामा आॅनलाईन – जसा दिवा विझताना फडफड होते, तशी राणेंची शेवटची फडफड सुरु झाली आहे असे वक्तव्य करत  पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर, राणे पिता-पुत्रांना मातोश्रीवर टीका करायची जुनी खोड आहे असेही ते म्हणाले. नारायण राणे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच पेटत असताना दिसत आहे. तो थांबण्याचे कोणतेही चिन्हा दिसत नाही.

रामदास कदम हे पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी राणेंवर निशाणा साधला. येत्या २४ डिसेंबरला पंढरपूर येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते येथे आले होते. यावेळी ते बोलत होते. राम मंदिर आणि झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन केल्याचे ते म्हणाले. ठाकरे यांची जाहीर सभा दुपारी ४ वाजता तर चंद्रभागा नदीची आरती येथील इस्कॉन मंदिराच्या घाटावरून सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे.

राणे हे गद्दार असून त्यांना शिवसेनेने मोठे केले. पण ते विसरले आहेत. आता त्यांची शेवटची फडफड सुरु आहे, असे त्यांनी म्हटले. कदम यांनी राणे पिता-पुत्रांवर सडकून टीका केल्याचे समोर आले.

ते म्हणाले की, “राज्यातील प्रमुख नद्यांच्या शुद्धीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम पर्यावरण विभागामार्फत हाती घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या विविध परवानग्या मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यासाठी व वारकऱ्यांना आवश्यक सेवा देण्यासाठी पर्यावरण विभागामार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.” तसेच नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी कदम यांनी ‘नमामि चंद्रभागा’ अभियानाचा आढवा घेतला.

खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, तहसिलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपवन संरक्षक संजय माळी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर आदी यावेळी उपस्थित होते.