मंत्री गुलाबराव पाटलांचे Twitter अकाऊंट हॅक, त्यांच्या प्रोफाईलवर झळकला परदेशी व्यक्तीचा फोटो
जळगावः पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडीतील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचे टविटर अकाऊंट अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी स्वतः गुलाबराव पाटील यांनी सोमवारी (दि. 15) रात्री पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
गुलाबराव पाटील यांचे ट्विटरवर @GulabraojiPatil हे अधिकृत अकाऊंट आहे. याच अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ते नेहमी ट्विट करत असून ते व्हेरीफाईड देखील आहे. मात्र गेल्या काही तासांपासून त्यांच्या अकाऊंटवर संशयास्पद बाबी आढळून आल्या आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे, त्यांच्या अकाऊंटची आधी सर्वांसाठी खुली असणारी टाईमलाईन ही प्रोटेक्टेड केली आहे. यामुळे कुणीही आता त्यांची टाईमलाईन पाहू शकत नाही. यासोबत त्यांच्या प्रोफाईलवरील गुलाबराव पाटील यांचा फोटो बदलला आहे. त्यांच्या जागी दुसर्याचाच एका परदेशी इसमाचा फोटो टाकण्यात आला आहे. परंतु, पाटील यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अद्यापपर्यंत कोणतेही संशयास्पद ट्विट करण्यात आले नाही. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.