शिवजयंती विशेष : नेमकं काय सांगते शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात १९ फेब्रुवारीला मोठ्या जल्लोषात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा केली जाते. ‘जाणता राजा’ म्हणजेच शिवाजी महाराज पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्रोत राहिले आहेत. शिवाजी महाराज १२ वर्षाचे असतानाच शहाजीराजांनी त्यांच्याकडून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पहिले होते आणि त्यास महाराजांनी सार्थ ठरविले. शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना एक राजमुद्रा आणि प्रधानमंडल देऊन त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले होते. दरम्यान या राजमुद्रेत एक गहन अर्थ दडलेला आहे. त्यामुळे महाराजांवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांचा आदर करणाऱ्या सर्वांनी या राजमुद्रेचा अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे.

प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।

‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, असा या मुद्रेचा अर्थ होतो. तर यावरून खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी महाराजांचे विचार आणि त्यांचे बुद्धिवैभव आपल्याला सहज लक्षात येऊ शकते. या राजमुद्रेमधला प्रत्येक शब्द हा फार विचारपूर्वक पद्धतीनं मांडण्यात आला असून त्या मुद्रेतून महाराजांच्या भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित केल्याचे दिसते.

यामध्ये ‘शहाजींचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणार, राष्ट्र निर्माण करणार’ हे ध्येय आहे तर ‘राष्ट्रनिर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल’ हा हेतू या मुद्रेतून स्पष्ट करण्यात आला आहे.  हे कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठीच त्याचे राज्य आहे असा विश्वास गांजलेल्या, दु:खी, कष्टी जनतेच्या मनात या राजमुद्रेद्वारे निर्माण केला आहे, असा अर्थ या राजमुद्रेतून व्यतीत होतो.