दादांच्या मनात काय चाललंय हे कळालं पाहिजे, म्हणून ‘ती’ भाषा शिकणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्म सोहळा पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांचं कार्य जगापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी राजकीय टोलेबाजीही केली ज्यामुळं उपस्थित पोट धरून हसले. अजित पवारांच्या मनातील गोष्टी ओळखण्यासाठी नवीन भाषा शिकणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.

छत्रपतींना अवगत असणाऱ्या भाषांचा उल्लेख करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शिवयोग हा एक नवीन शब्द आहे. त्यासोबत शिवसुमन हे फूल. हे फूल आधी पाहिलं नव्हतं अशातला भाग नाही, परंतु त्याचं वैशिष्ट्यं आज कळालं. ते फूल शिवनेरी परिसरातच पहिल्यांदा आढळून आलं हा शिवयोग आहे. ज्यांनी ते शोधलं, त्याचं वेगळेपण ओळखलं त्यांचं मी कौतुक करतो.

पुढं बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाषा यायच्या याबद्दल अतुलजी मला सांगत होते. त्यात एक भाषा होती इंगित विद्याशास्त्र. ही भाषा दादांना (अजित पवार) येते. आता मी ती भाषा शिकणार आहे का ? तर दादांच्या मनात काय चाललंय ते कळालं पाहिजे. भाषा शिकतो आणि मग दादांनी मास्क लावू द्या, गॉगल घालू द्या, तरीही ओळखून दाखवेन दादांच्या मनात काय चाललंय. हे ऐकताच उपस्थित पोट धरून हसू लागले.

सीएम ठाकरे असंही म्हणाले, काही गोष्टी अशा असतात की त्याला भाषेची गरज नसते. एखादी गोष्ट करायची ठरवलं की, बाकी सगळ्या गोष्टी गौण असतात. त्या एका जिद्दीनं आम्ही सर्वजण एकत्र आलो आहतो. मी असेन, दादा असतील किंवा संभाजीराजे असतील. आमच्या मनातील शिवप्रेम हा धागा महत्त्वाचा आहे.