शिवराज्याभिषेकदिनी शनिवारवाडयावर ५१ फुटी ‘स्वराज्यगुढी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष… ३५१ ढोलताशांची भव्यदिव्य मानवंदना…पारंपरिक वेशात सुवासिनींनी केलेले औक्षण… मराठमोळया पुणेकरांचा जल्लोष आणि स्वराज्यगुढी उभारताना शिवज्योतींनी झालेली शिवरायांची महाआरती… अशा शिवमय झालेल्या उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांना मानवंदना देत शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने ५१ फूट स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक दिन शनिवारवाडयाच्या ऐतिहासिक प्रांगणात मोठया उत्साहात साजरा झाला.

निमित्त होते, ३४५ व्या शिवराज्याभिषेक दिनाचे. यावेळी महापौर मुक्ता टीळक, इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, धर्मराज हांडे महाराज, समितीचे संस्थापक अध्यक्ष व स्वराज्य गुढीचे संकल्पक अमित गायकवाड, समन्वयक सुनील मारणे, शिरीष मोहिते, नितीन पंडित, शांताराम इंगवले यासह असंख्य पुणेकर उपस्थित होते. शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यातील सर्व स्वराज्य घराणी यांच्या शुभहस्ते श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह ही स्वराज्यगुढी दिमाखात उभारण्यात आली. फर्जंद सिनेमातील कलाकार देखील यावेळी उपस्थित होते.

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन रायगड, पुण्यासह संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा होत आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिन स्वराज्य दिन म्हणून सर्वत्र साजरा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे आश्वासनही त्यांनी दिले.

अमित गायकवाड म्हणाले, श्री शिवछत्रपतींनी ६ जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्य स्थापन करुन भारताच्या गौरवशाली संस्कृतीचे ख-या अथार्ने रक्षण केले होते. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनाचे अनन्य साधारण महत्व देशवासियांना समजावे, याकरीता ६ जून हा दिवस महाराष्ट्र शासनाने स्वराज्यदिन म्हणून जाहीर करावा. शिवराज्याभिषेक मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात ही संकल्पना समितीतर्फे आम्ही राबविण्याचे आवाहन केले होते. याला पुणेकरांनी मोठया प्रतिसाद देत घराघरात शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला.
सोहळ्याचे यंदा ६ वे वर्ष असून शिवगर्जना, नादब्रह्म ट्रस्ट, नूमवी, जय शिवराय, सह्याद्रीगर्जना, रुद्र्रगर्जना, शिवनेरी ही पुण्यातील नामांकीत ढोलताशा पथके वादनात सहभागी झाली. पुण्यातील शिवाजी मर्दानी आखाडातर्फे शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात आली. अमित गायकवाड यांनी रचलेली श्री शिवछत्रपतींची आरती उपस्थित महिलाभगिनींच्या हस्ते झाली.

समितीचे समन्वयक अनिल पवार, शांताराम इंगवले यांच्या पुढाकारने पुणे जिल्हा परिषदेने मुख्य सदनासोबतच १३ पंचायत समिती कार्यालये, १७०० ग्रामपंचायतींमध्ये स्वराज्यध्वजासह स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला. याशिवाय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत विवीध संघटना, संस्थांच्या मार्फत दुर्गदुर्गेश्वर रायगड, लालमहाल, संभाजी महाराज पुतळा डेक्कन, चंद्र्रमौलेश्वर मंदिर हडपसर, वारजे चौक, नळस्टॉप चौक, १५ आॅगस्ट चौक, शिवणे गाव, नांदेड गाव, वीर बाजी पासलकर भवन, खेड-शिवापूर अशा असंख्य ठिकाणी चौकाचौकात, गावागावात स्वराज्यगुढी उभारत शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. बाळासाहेब अमराळे, निलेश जेधे, गोपी पवार यांनी प्रत्येकी १ तोळा सोने समितीकडे सुपूर्द केले.

कार्यक्रमाचे आयोजन अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ ढमढेरे, सचिन पायगुडे, अनिल पवार, किरण देसाई, महेश मालुसरे, रवींद्र्र कंक, शंकर कडु, कुमार रेणुसे, गिरीश गायकवाड, दिपक घुले, किरण कंक, समीर जाधवराव, दिग्वीजय जेधे, निलेश जेधे, मंदार मते, मयुरेश दळवी, यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले.