’22 आमदारांना ED ची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षभरापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि समर्थक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. भाजपच्या या हस्तकांनी मला २२ आमदारांची यादी दाखवली. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची नावे होती. या आमदारांवर ईडीचा दबाव आणला जाणार आणि त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगण्यात आलं आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

..मोहात पडू नका
खासदार संजय राऊत म्हणाले, आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग आहे, आम्ही तुम्हा सर्वांना टाईट करणार आहोत, अशी धमकीही मला दिली जात आहे. पण मीही त्यांचा बाप आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि काही समर्थक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. सरकारच्या मोहात पडू नका. सरकारच्या विश्वासू समर्थकांना ईडीमार्फत त्रास देण्याचे काम सध्या सुरू आहे. हे समर्थक सरकार पाडण्यात अपयशी ठरले. कारण त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती. यामुळेच सरकारच्या विश्वासू समर्थकांना आणि सरकार बनविण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या नेत्यांना ईडीमार्फत त्रास देण्याचे काम सुरू आहे, असा दावाही राउतांनी यावेळी केला. भाजपच्या समर्थकांनी त्या २२ आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि सरकार पाडले जाईल, असे मला सांगितले आहे. प्रताप सरनाईक हे त्याचे टोकून आहे. आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही. आमची तयारी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे, असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे.

केंद्रातल्या पक्षानं भडास काढणे
वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईकांना ईडीकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेत असलेले नेते जेव्हा दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा त्यांना, असे कागदाचे तुकडे पाठवले जातात. केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा ईडी, सीबीआयसारखी हत्यारे वापरावी लागतात. पूर्वी सीबीआय, ईडीने कारवाई केली, की लोकांना त्याबद्दल गांभीर्य वाटायचे. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कारवाया म्हणजे केंद्रातल्या पक्षानं भडास काढणे हे लोकांनी गृहित धरले आहे,’ अशा शब्दांत राऊतांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं.