विधान परिषद : … म्हणूनच उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेकडून उमेदवारी

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ नावांचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शुक्रवारी सुपूर्द केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय मंत्री अमित देशमुख यांनी ही यादी राज्यपालांकडे सादर केली. त्यामध्ये शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावरती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उर्मिला मातोंडकर यांना उमदेवार देण्याचे कारण सांगितलं आहे.

वार्ताहारांना बोलताना संजय राऊत म्हणाले, “उर्मिला मातोंडकर यांचे नाव शिवसेनेच्या यादीत आहे. उर्मिला मातोंडकर यांच्यासारखी सडेतोड बोलणारी व्यक्ती, देश आणि महाराष्ट्रातील प्रश्नांची जाणं असणारी अभिनेत्री सभागृहात गेल्यावरती महाराष्ट्राला फायदा होईल.”

तद्वतच, महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात सुरु असलेले शाब्दिक युद्ध पाहता यादी मंजूर करण्यात येणार नाही असे बोलले जात आहे. त्यावरती राऊत म्हणाले, “राज्यपाल हे कोणताही राजकीय बखेडा निर्माण करणार नाही. राज्यपाल सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचे प्रेम आहे, राज्यपालांचेही आमच्यावर प्रेम आहे. ते किती प्रेम आहे हे देशाला माहिती आहे, या प्रेमातूनच पुढील सर्व कारभार सुरळीत होईल.”

राज्यपालांना देण्यात आलेली १२ नावे

शिवसेना – उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी

राष्ट्रवादी – एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे

काँग्रेस – सचिन सावंत, मुझ्झफर हुसेन, रजनी पाटील आणि गायक अनिरुद्ध वनकर