धनंजय मुंडेंच्या मेहुण्याने केली होती रेणुसह तिच्या बहीण भावाविरोधात तक्रार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीतील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता रेणू शर्मा, तिचा भाऊ आणि बहिणीविरोधात ब्लॅकमेल करून खंडणी उकळल्याप्रकरणी मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गुरुवारी (दि. 14) दिवसभरात भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनीष धुरी यांनी रेणूविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यामुळे मुंडे प्रकरणात कालपासून नवेनवे खुलासा होत असून वेगळ्या वळणावर हे प्रकरण आले आहे.

धनंजय मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनी मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा, तिची बहीण रेणू शर्मा आणि त्यांचा भाऊ यांच्याविरोधात तक्रार दाखल 12 नोव्हेंबर 2020 मध्ये केली होती. वेगवेगळ्या वेळी अनेकदा त्रास देण्याचा प्रकार घडला. नजीकच्या काळात हे प्रकार वाढतच गेले. रुग्णालयातही त्यांनी त्रास दिला त्रास सहन होईना म्हणून मी तक्रार दाखल केल्याचे ते म्हणाले. त्यानंतर 2019 मध्ये धनंजय मुंडे आमदार झाल्यापासून त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याची माहिती केंद्रे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.