सख्खा भाऊच निघाला पक्का वैरी, मित्राच्या मदतीने केला विधवा बहिणीचा निर्घृण खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुढी पाडव्यानिमित्त आईला भेटण्यासाठी आलेल्या विधवा बहिणीचा भावाने मित्राच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.20) केज तालुक्यातील बोरगाव येथे पहाटे दीडच्या सुमारास उघडकीस आली. शितल लक्ष्मण चौधरी असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत शीतल यांच्या पतीचा मृत्यू झाला असून त्या पुण्यात आपल्या मुलीसह रहात होत्या. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

शितल चौधरी या पाडव्यानिमित्ताने आईला भेटण्यासाठी केज तालुक्यातील बोरगाव येथे काही दिवसांपूर्वी मुलीसह आली होती. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास सर्वजण जेवण करुन झोपले होते. मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास भाऊ दिनकर गोरख गव्हाणे व त्याच्या मित्र दिगंबर धनंजय वळेकर यांनी आईजवळ झोपलेल्या शितलच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन पळून गेले.

शीतलच्या आईने आरडा ओरडा केल्यानंतर आरोपी पळून गेले. डोक्यात वर्मी घाव लागल्याने शीतल गंभीर जखमी झाल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शीतलचा चुलत भाऊ नानासाहेब जालिंदर गव्हाणे याने केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिनकर गव्हाणे आणि त्याचा मित्र दिगंबर वळेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार केली आहेत. मात्र, या घटनेने बहीण भावाच्या पवित्र नात्यात असे कोणते कारण ठरले की भावाने आपल्या सख्ख्या बहिणीलाच संपवले. याचा तपास पोलीस करत आहेत.