धक्कादायक… नीरव मोदी सोबत पीएनबी बँकेचे ५४ कर्मचारी सामील  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून परदेश गाठलेल्या नीरव मोदी प्रकरणाबाबत आणखी एक माहिती उघडकीस आली आहे. तब्बल १३ हजार ६०० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या कर्जांघोटाळ्यास या बँकेतील कर्मचारी,अधिकारी कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. या घोट्याळ्याच्या चौकशी दरम्यान ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या जोडीला आता पंजाब नॅशनल बँकेच्या ५४ कर्मचारी,अधिकारी, लेखापाल यांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.
जानेवारी महिन्यात हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर या बँकेने याविषयी २९ जानेवारी रोजी पहिली पोलीस तक्रार केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी परदेश गाठले आहे. यानंतर मात्र बँकेकडून अंतर्गत तपास आणि चौकशी केली. याचा १६२ पानी अहवाल सादर केला आहे. यात कारकून, परकीय विनिमय व्यवस्थापक (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजर्स), लेखापाल, अधिकारी, शाखा व्यवस्थापक आदी ५४ जणांचा समावेश आहे. यात ५४ जणांनी मोदी आणि मेहुल चोकसीला मदत केल्याचे म्हंटले आहे. यातील २१ जणांची हकालपट्टी करण्यात आली असून कोणत्याही दोषी व्यक्तीला मोकळे सोडले जाणार नसल्याचे बँकेचे सीईओ सुनील मेहता यांनी म्हटले आहे. यातील आठ जणांवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
खरेतर पंजाब नॅशनल बँक ही देशातील दुसऱ्या  क्रमांकाची बँक आहे. पण यांच्या दैनंदिन कामकाजात बऱ्याच त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. नीरव मोदी प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेच्या  ब्रॅडी हाऊस शाखा घोट्याळ्याचे केंद्र असल्याचे दिसून आले आहे. या शाखेचे उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी यांनी स्विफ्ट या इंटरबँक मेसेजिंग नेटवर्कच्या माध्यमातून मोदी व चोक्सीला कर्ज मिळावे यासाठी अनेक वर्ष बनावट बँक गॅरंटी दिल्याचा आरोप आहे.