आरक्षणासाठी झुलवत ठेवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा : जानकर

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी आंदोलन करूनही धनगर समाजाला सरकारकडून न्याय मिळत नाही. सत्तेत येताना समाजाच्या मतापुरते आरक्षण देतो म्हणून झुलवत ठेवणाऱ्यांना येत्या निवडणुकीत जागा दाखवण्यासाठी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता समाजाने एकत्र यावे, असे आवाहन बहुजनांचे नेते उत्तमराव जानकर यांनी केले.

चिटमोगरा (ता. बिलोली) येथे आयोजित धनगर आरक्षण एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गोपीचंद पडळकर, माणिकराव लोहगावे, डॉ. यशपाल भिंगे, शिवदास भीडकर, दिलीपराव बंदखडके, विजय पाटील, सातपुतेमामा, बालाजी बईलकर होते. गोपीचंद पडळकर यांनी राजकारण व प्रशासनातील मोक्याच्या जागा ताब्यात घेण्यासाठी आता कोणत्याही नेत्याच्या पाठीमागे न लागता आपण या जिल्ह्यात एक खासदार व किमान चार आमदार निवडून आणू शकतो हे दाखवून देण्यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघात माणिकराव लोहगावे तुम्ही उभा टाका समाज तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहत नाही असा विश्वास दिला.

धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला धनगर बांधवांनीे उपस्थित रहावे असे आवाहन केले. संभाजीराव धुळगंडे यांनी आपण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो. मात्र त्या वेळी कसलेही पाठबळ नसल्याने मला खूप त्रास सोसावा लागला. हा त्रास होऊ द्यायचा नसेल तर झोपेत न रहाता जागे रहा असे आवाहन केले. शाम मजगे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.