6 वर्षाच्या मुलाला लागली गेम खेळण्याची ‘सवय’, आईच्या क्रेडिट कार्डमधून गुपचूप उडवले तब्बल 12 लाख

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्या नवनवीन ऑनलाईन गेमिंगच फॅड सूरू आहे. मुले तासनतास या गेम्सवर आपला वेळ घालवतात. ज्यामूळे नकळत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हेच ऑनलाईन गेमिंगच खूळ एका आईला तब्बल 12 लाखाला पडलं आहे. वास्तविक सहा वर्षाच्या मुलाने गेम खेळण्याच्या नादात आईच्या क्रेडिट कार्डवर गुप्तपणे 11.77 लाख रुपये खर्च केले. मुलगा आईच्या आयपॅडवर गेम खेळत होता, याा दरम्यान त्याने व्हर्च्युअल ‘गोल्डन रिंग्स’ खरेदी करण्यासाठी अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर आईच्या क्रेडिट कार्डचा अनेक वेळा वापर केला. ज्यामूळे क्रेडिट कार्डवरून सुमारे 12 लाख रुपये उडाले. ही घटना अमेरिकेच्या कनेक्टिकटची आहे.

माहितीनुसार, जॉर्ज जॉन्सन असे या सहा वर्षाच्या मुलाचे नाव आहे. आई जेसिकाच्या आयपॅडवर जॉर्ज त्याचा आवडता खेळ सोनिक फोर्सेस खेळत होता. त्याच वेळी, त्याने नवीन कॅरॅक्टर वापरण्यासाठी आणि वरच्या लेवलवर पोहोचण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला. यानंतर, जेव्हा पहिल्यांदा जेव्हा क्रेडिट कार्डचे बिल वाढवून आले, तेव्हा जेसिकाला काहीच समजले नाही. जेसिकाला वाटले की, कोणीतरी फ्रॉड केले असावे, यामुळे, तिने प्रथम बँकेत संपर्क साधला. नंतर संपूर्ण प्रकार लक्षात आल्यावर तिने आपल्या 6 वर्षाच्या जॉर्जला वास्तविकतेबद्दल सांगितले, तेव्हा जॉर्जने उत्तर दिले – आई, मी तुला पैसे देईन.

जेसिका म्हणाली की यावर्षी तिचे उत्पन्न 80 टक्क्यांनी कमी झाले आहे. आता ख्रिसमस कसा साजरा करायचा हे आम्हाला ठाऊक नाही. सुरुवातीला 60 दिवस तिला अ‍ॅपसशी संपर्क साधता आला नाही. आता कुटुंबाला एवढी मोठी रक्कम भरण्यात अडचणी येत असून अ‍ॅपलने पालकांना पैसे परत करण्यास नकार दिला आहे. कारण पालक चाइल्ड प्रूफ सेटिंग चालू करू शकले नव्हते. त्याचवेळी, आपल्या मुलाच्या विचित्र कृत्यावर, आई जेसिका म्हणाली की, आपल्या मुलाची वागणूक एखाद्या व्यसनाधीनतेसारखी झाली होती. तसेच तिने या खेळाला फसवणूक म्हणून संबोधले.