… म्हणून अमरावतीत 20 रुग्णवाहिका सायरन वाजवत जात होत्या स्मशानभूमीकडे, जाणून घ्या प्रकरण

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच अमरावतीत एका 50 वर्षीय खासगी रुग्णवाहिका चालकाचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील रुग्णवाहिका चालकांसाठी ही बाब धक्कादायक ठरली. त्यामुळे शहरातील रुग्णवाहिका चालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शवविच्छेदनगृह ते हिंदू स्मशानभूमीपर्यंत सायरन वाजवीत रांंगेत 17 ते 20 रुग्णवाहिका नेऊन सहकाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभाग दर्शविला अन् अनोखी श्रद्धांजली वाहिली. एकाचवेळी सुमारे 17 ते 20 रूग्णवाहिका हिंदू स्मशानभूमीच्या दिशेने जात असल्याचे पाहून अमरावती शहरात कोरोनाबाधित मृत्यूचा स्फोट तर झाला नाही, अशी भीती नागरिकांना झाली होती.

प्राप्त माहितीनुसार, मृत्यू झालेल्या रुग्णवाहिका चालकाला 9 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात सारीच्या वॉर्डातील दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यामुळे रुग्णालयातूनच त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हिंदू स्मशानभूमीत नेण्यात आला. आपला सहकारी गेल्याचे दुख: अन्य खासगी रुग्णवाहिका चालकांना झाले.

रुग्णवाहिका चालक संघटनेने अनोखी श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सायरनचा जोरदार आवाज करीत रुग्णवाहिका रेल्वे स्थानक चौक, राजकमल चौक, गांधी चौक, भुतेश्वर चौक येथून हिंदू स्मशानभूमीकडे निघाल्या. या सर्व रुग्णवाहिका अमरावती येथील हिंदू स्मशानभूमीत एकत्र आल्या आणि त्याठिकाणी त्यांनी आपल्या या साथीदाराला श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. मात्र, रुग्णवाहिका चालकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सायरन वाजवीत हिंदू स्मशानभूमीपर्यंत गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना सायरन वाजवायला बंदी आहे. त्याअनुषंगाने रुग्णवाहिका चालकांचे नाव निष्पन्न करून गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी दिली.