…म्हणून हा निर्णय अपेक्षितच होता : आरोग्यमंत्री टोपे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    देशभरात आज ड्राय रन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक मोठी व देशवासियांना दिलासा देणारी घोषणा केली. कोरोना लस देशभरात मोफत दिली जाणार आहे असं त्यांनी जाहीर केलं. तर, केंद्र सरकारच्या या निर्णयाचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “निश्चितच मी देखील या निर्णयाचं स्वागतच करेल, हा निर्णय अपेक्षितच होता. कारण, मला वाटतं ते भारत सरकारचं उत्तरदायित्व आहे. त्यामुळे असं करायला हवचं होतं. लस ही मोफत असायलाच हवी, लोकांकडून पैसे घेतले गेले नाही पाहिजे. तसंच, आपल्या देशात ३५ टक्के जनता ही दारिद्र रेषेखालील आहे. अशा परिस्थितीत जर आपण लसीकरणासाठी पैसे घेत राहिलो तर अतिशय चुकीचा संदेश सरकारबद्दल जातो.

अफवांवर विश्वास ठेवू नका

केंद्र सरकाराने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. राज्य सरकार म्हणून आम्ही कुठही कमी पडणार नाही. ते ज्या सूचना देतील, जे नियम सांगतील त्यांचे आम्ही तंतोतंत पालन करू. राज्यातील जनतेच्या सेवेत आम्ही कुठही कमी पडणार नाही, असा विश्वास मी आरोग्यमंत्री या नात्याने देतो. देशातील नागरिकांना मी आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमता याची खात्री करणे, याला आमचं प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे तसंच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. ”

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. देशभरात ड्राय रन केलं जात आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी करोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली.