सोलापूर : पती पत्नीचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; दोघांनीही दिली एकमेकांना जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या कारण

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – विवाहाच्या १५ दिवसानंतर सुरु झालेला पती पत्नीचा वाद तीन महिन्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे दोघांनीही परस्पर तक्रारी दिल्या आहेत. एवढेच नाही तर दोघांनीही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

२३ डिसेंबर २०२० रोजी उमर फारूक शेख यांच्याशी विजयपूर रोडवरील ओमगर्जना चौक (रोहिणी नगर) येथील सना यांचा विवाह झाला. त्यानंतर 15 दिवसांतच त्यांच्यात भांडण सुरू झाले आणि १४ मार्च रोजी त्यांचा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोचला.

सना शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासरच्या मंडळींनी माहेरहून ५ लाख रुपये आणण्यासाठी शिवीगाळ केली. पैसे न दिल्यास फाशी घ्यावी लागले अशी धमकी दिली. त्याच बरोबर मला सासरी सोडण्यासाठी आलेल्या आई – वडील, भाऊ – बहीण त्यावेळी सासरकडील लोकांनी सर्वांना शिवीगाळ करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सना शेख यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार उमर शेख (पती), बिलाल शेख, यासिन शेख (दीर), करिमा शेख (सासू), करिष्मा बिलाल शेख (जाऊ), तबस्सुम यासिन शेख (मोठी जाऊ), शकिला हाफीज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतच अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वाल्मीकी हे करीत आहेत.

दुसरीकडे उमर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सना, शेकुम्बर पटेल, हसिना शेख, अझहर शेख, सानिया शेख यांच्यासह अन्य पाचजणांनी हातावर ब्लेडने वार करून जखमी केले. विवाहाचा खर्च म्हणून दहा लाखांची मागणी करत भांडणात वहिनीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. याचा तपास पोलिस नाईक माडे हे करीत आहेत.

मारहाण करून पाचजणांनी चोरला दागिन्यांसह २७ हजाराचा मुद्देमाल
जुना तुळजापूर नाका याठिकाणी ऊसतोडीच्या टोळीसोबत बोलण्यासाठी थांबलेल्या कविता बाबा राठोड (रा. आनंद नगर तांडा, लोहारा, जि. उस्मानाबाद) यांना गणेश बाळू धुमाळ याने तुम्ही इथे का थांबलात म्हणून शिवीगाळ करून भांडण सुरू केले. तसेच अन्य दोन साथीदारांना बोलावून कविता राठोड यांना मारहाण केली. गळ्यातील मंगळसूत्र जबदरस्तीने हिसकावले. ट्रॅक्‍टर चालकाच्या खिशातील दहा हजार रुपये व ऊसतोड कामगार आकाश चव्हाण याच्या खिशातील मोबाईल काढून घेतल्याची फिर्याद कविता राठोड यांनी दिली. त्यानुसार धुमाळ, सुरेश बिन्ना भोसले, पप्पू भीमा धुमाळ (रा. तळेहिप्परगा) यांच्यासह दोघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.