Solapur News : मार्कंडेय रुग्णालयात ऑक्सिजन टँकचा स्फोट, दोघांचा मृत्यू

सोलापूरः पोलीसनामा ऑनलाईन – रुग्णालयातील ऑक्सिजन टँकचा स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. सोलापुरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयात बुधवारी (दि.24) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतामध्ये एक रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाचा समावेश आहे.

हनुमंत क्षीरसागर आणि सुनील लुंगारे असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या दोघांच्या मृत्यू ऑक्सिजन टँकचा स्फोटामुळे झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने मात्र नातेवाईकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मृत रुग्णाची परिस्थिती ही आधीच खालावलेली असल्याचा दावाही रुग्णालय प्रशासनाने केला आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतर दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दोन ऑक्सिजन टँक आहेत. त्यात 1 नवीन तर दुसरा जुना टँक आहे. यातील जुन्या टँकमध्ये स्फोट झाला होता. केमिकल रिॲक्शनमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. स्फोटामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाल्याने कोविड सेंटरसह जनरल वॉर्डमधील रुग्ण जीवाच्या आकांताने बाहेर पळत सुटले. त्यानंतर अग्निशन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर आणि उपायुक्त धनराज पांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने नवीन टाकीद्वारे ऑक्सिजन सप्लाय सुरू होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.