कोरोनाबाधित रूग्णांची माहिती लपवून हलगर्जीपणा करणार्‍या सोलापूरातील 2 डॉक्टरांवर FIR

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रभाव सोलापूर जिल्ह्यातही दिसून येत आहे. तर येथील खासगी रुग्णालयांतील २ डॉक्टरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर श्वास घेण्यास त्रास होत असतानाही करोनाबाधित रुग्ण दाखल झाल्याची माहिती या डॉक्टरांनी महानगरपालिका प्रशासनापासून लपवली

अधिक माहितीनुसार, येथील; विजापूर रोडवरील शांतीनगर मधील ८४ वर्षीय रुग्ण १२ एप्रिलला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने क्लिनिकमध्ये दाखल झाले. तेव्हा डॉ. युवराज माने यांच्याकडे प्रत्यक्ष उपचार घेतले. डॉ. युवराज माने यांनी रुग्णाची कोविड १९ टेस्ट केली नाही. तसेच रुग्णाची माहिती महापालिकेला दिली नाही. दरम्यान या रुग्णाचा श्वसनाचा त्रास वाढला. तो शहरातील ESI हॉस्पिटलमधील कोरोना वार्डात दाखल झाले. परंतु. त्याच दिवशी सकाळी त्या रुग्णाचे निधन झाले. ही माहिती डॉ. पी. आर. नंदीमठ यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली असता, मृताचे शवविच्छेदन करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यूपश्चात कोरोना टेस्ट केल्यावर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

या सर्व प्रकरणावरून निर्मल क्लिनिकचे डॉ. युवराज माने (वय ४४ रा. विजापूर रोड, सोलापूर ) यांनी उपचारावेळी हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले. सोलापूरचे पालिका आयुक्त आणि विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी यांच्या निर्गमित केलेल्या वरील आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच अक्कलकोट रोडवरील डॉ. जी. बी. विश्वासे यांच्या नित्यानंद रुग्णालयातही भेट दिली. तेथील दैनंदिन नोंदी तपासल्या असता, त्यातही अनियमितता आढळून आली. त्यांच्याकडील रुग्णांची योग्य माहिती दिली गेली नाही. सौम्य लक्षणे असलेल्या व मध्यम लक्षणे असलेल्या व्यक्तींची करोना तपासणी करण्याकरिता आरोग्य केंद्राकडे माहिती देत नसल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला गेला आहे.