सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमादरम्यान धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामांतर करण्यात आले आहे. मात्र या नामविस्ताराच्या कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या भाषणादरम्यान धनगर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. नामविस्तारासाठी सुभाष देशमुख यांनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत मग ते कार्यक्रमाचे अध्यक्ष कसे असू शकतात ? असा आरोप करीत सुभाष देशमुखांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना रामा शिंदे म्हणाले, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामांकन करण्यात यावे यासाठी अनेक वर्षे लढा देण्यात येत होता अखेर या लढ्याला यश मिळाले आहे. धनगर समाजच्या अन्य मागण्यांचाही सरकार सकारात्मक विचार करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. लिंगायत समाजाची याचिका असताना नामविस्तराची घाई का? असे विचारले असता सरकारला असलेल्या अधिकारांचा वापर करत कायदेशीर प्रक्रिया पार पडल्याचं राम शिंदेंनी सांगितलं.

सुभाष देशमुखांच्या भाषणादरम्यान गोंधळ

नामविस्तारासाठी सुभाष देशमुख यांनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत मग ते कार्यक्रमाचे अध्यक्ष कसे असू शकतात ? असा आरोप करीत धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या भाषणादरम्यान गोंधळ घातला. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मात्र तरीदेखील त्यांनी भाषण चालूच ठेवले. यावेळी त्यांनी राज्य सरकार कोणत्याही समुदायावर अन्याय करणार नाही. लिंगायत समाजातर्फे सोलापूर विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी आहे, त्यावरही सकारात्मक विचार करु, असं आश्वासन दिलं.

दरम्यान,आजच्या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता पोलिसांनी शिवा संघटनेचे शहराध्यक्ष शरणबसप्पा केंगणाळकर, कांचन फाउंडेशनचे सुदीप चाकोते यांच्यासह ७-८ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि कार्यक्रम झाल्यावर त्यांची सुटका केली. जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, राज्यसेभेचे खासदार विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.