आता तुम्हीही मिळवू शकता ‘गुगल’च्या ‘डूडल’कडून शुभेच्छा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गूगल नेहमी ‘गुगल डूडल’ च्या माध्यमातून व्यक्ती किंवा त्या दिवसाची खासियत प्रमाणे आपल्या डूडलवरून व्यक्तीच्या कार्याला मानवंदना देते किंवा प्रत्येक देशातील काही वेगळं शोधून किंवा आणखी काही त्यानुसार संशोधन करुन हे डूडल बनवले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का ? गूगल तुमच्या वाढदिवशी देखील तुम्हाला खास डूडल तयार करून शुभेच्छा देतं. मात्र यासाठी जीमेलवर लॉगइन करणं महत्त्वाचं आहे.
२०१० पासून गुगलने युजर्सना अशाप्रकारे डूडल तयार करून शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता काळानुसार तंत्रज्ञानाच्या मदतीने यामध्ये नवनवीन बदल आणि खास गोष्टी देण्यात आल्या आहेत. फुगे, केकच्या माध्यमातून तर कधी कधी युजर्सना आवडणाऱ्या गोष्टींच्या मदतीने आकर्षक आणि हटके डूडल तयार करून गुगलकडून युजर्सना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
असे तयार होईल तुमच्या वाढदिवसाचे डूडल –
तुम्हालाही तुमच्या वाढदिवशी विशेष डूडल तयार करून गुगलकडून शुभेच्छा हव्या असतील तर सर्वप्रथम गुगलच्या सर्च इंजिनवर तुमच्या जीमेल अकाउंटवरून लॉगइन करणं अत्यंत गरजेचे आहे. तसेच त्यानंतर जीमेल आयडीवर तुम्ही बरोबर वाढदिवसाबाबतचे तसेच विचारण्यात आलेले इतर डिटेल्स द्या. डिटेल्स दिले असतील तरच गुगल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे. गुगल एक खास डूडल तयार करून तुम्हाला या शुभेच्छा देईल.
गूगल डूडल हे गूगलच्या सर्च इंजिनवर असणारा एक  लोगो आहे. गुगलच्या लोगोला एखाद्या प्रसिद्ध समारंभ, उत्सव, महान व्यक्तींच्या जयंती किंवा जागतिक दिन विशेष या निमित्त बदलवून तो त्या दिन विशेष अनुरुप तयार केला जातो. अशा तयार केलेल्या गुगल च्या लोगोला ‘गुगल डूडल’ म्हणुन ओळखतात.