“खेळामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो” : पोलीस उपअधिक्षक श्रीकांत डिसले

अंबाजोगाई : प्रतिनिधी – ‘क्रिकेट खेळामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो’, कोणतेही खेळ खेळल्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो, असे प्रतिपादन केजचे  पोलीस उपअधिक्षक श्रीकांत डिसले यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा झोनल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन  दि.०२ डिसेंबर ते ०४ डिसेंबर २०१८ या दरम्यान केले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमात पोलीस उपअधिक्षक श्रीकांत डीसले  उद्घाटक म्हणून बोलत होते.

खेळाडूंनी जिद्द बाळगली पाहिजे, यश मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यश मिळाले तर हुरळून जावू नये व अपयश पदरी आले तर खचूनही जावू नये असे प्रतिपादन श्रीकांत डिसले यांनी केले. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या ठिकाणी सर्वोच्च राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्रिकेट हा जंटलमनचा खेळ म्हटला जातो. खेळाडूंनी तेवढयाच संयमाने खेळ खेळावा व आपल्या महाविद्यालयाचा, गावाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी खेळाडूंना केले.

या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप श्री.योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अड.शिवाजीराव कराड यांनी केला. त्यांनी माणसाचे जीवन देखील एक खेळ आहे, प्रत्येक व्यक्ति हा खेळाडूच असतो, प्रत्येकाने संयम बाळगला पाहिजे, जीवनाच्या खेळात यशस्वी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत प्रतिपादन केले. खेळामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो व त्यातूनच चांगले नागरिक घडतात असे मत अड.शिवाजीराव कराड यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद चे क्रिडा संचालक डॉ.अजयसिंग दिख्खत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

श्री.योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव गणपत व्यास (गुरुजी) यांनी झोनल क्रिकेट स्पर्धेतून राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली तर  श्री.योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.माणिकराव लोमटे यांनी खेळाडूंनी निकोप स्पर्धा ठेवावी असे आवाहन केले. यश-अपयश पचविण्याची मानसिकता खेळाडूंनी जोपासली पाहिजे असे आवाहन प्रा.माणिकराव लोमटे यांनी केले.

या उद्घाटन प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.एस.के.खिल्लारे यांनी खेळाडूंनी खेळाडूवृत्तीने खेळ खेळावा, खेळाडूवृत्ती जोपासावी असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक क्रिडा विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ.प्रविण भोसले यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाने मागील आठ वर्षापासून यशस्वीरित्या स्पर्धेचे आयोजन केले आहे, अनेक चांगले खेळाडू या स्पर्धेने दिले आहेत असे प्रतिपादन त्यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.किरण चक्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.बिजयसिंग भाबरदोडे यांनी केले. या कार्यक्रमाला श्री.योगेश्वरी शिक्षण संस्थेचे  सहसचिव एस.के.बेळूर्गीकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, खेळाडू, क्रिकेटप्रेमी,  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील आठ संघांनी सहभाग घेतला आहे. दि.०२ डिसेंबर ते ०४ डिसेंबर २०१८ या कालावधीत या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us