संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७२३ व्या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज (माऊली) यांच्या ७२३ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यातील गावा-गावांमधून निघालेल्या दिंड्या अलंकापुरीत पोहोचत आहेत. दिंड्यांच्या आगमनामुळे अलंकापुरीतील धर्मशाळा, राहुट्या, मंदिरांमध्ये टाळ-मृदंगाचा नाद घुमू लागला आहे.

आज शुक्रवारी (दि. ३०) पालखी सोहळ्याचे मालक वै. गुरू हैबतबाबांच्या महाद्वारातील पायरी पुजनाने खऱ्या अर्थाने माऊलींच्या समाधी सोहळ्यास सुरूवात झाली असून संजीवन समाधी सोहळा सोमवारी कार्तिकी एकादशी दिवशी (३ डिसेंबर) रंगणार आहे.

विना आमंत्रितांचा अलौकिक सोहळा
संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी वर्ग असतो. शहरात सर्वत्र सोहळ्याची लगभग सुरू असून, काही ठिकाणी आपला ऊन, वारा, पाऊसापासून बचाव व्हावा म्हणून राहुट्या उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच आलेल्या लाखो भाविकांच्या दर्शनासाठी दर्शन बारीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक मिळेल त्या वाहनाने तसेच दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून आळंदीत दाखल होत आहेत. कारण हा विना आमंत्रितांचा अलौकिक असा भागवत धर्माची पताका उंचावून जगाला शांतीचा संदेश देणारा सोहळा आहे.

भक्‍तीचा मळा फुलला
या सोहळ्यासाठी अलंकापुरीतील धर्मशाळा, राहुट्या, मंदिरे गजबजू लागली असून पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’, श्री ज्ञानदेव तुकाराम’, माऊली माऊली’, ज्ञानेश्वर महाराज की जय’च्या जयघोषाने अवघी अलंकापुरी भक्‍तीमय झाली आहे. तर इंद्रायणी तीरावर महिला वारकरी; तसेच तरुण वारकरी फुगड्या खेळण्यात दंग झाले आहेत. बाजारपेठेत तुळशीच्या माळा, पूजेचे साहित्य, खेळणी, आदी वस्तूंची दुकाने सजू लागली आहेत. तसेच आळंदीत आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाचा खडा पहारा तैनात करण्यात आला आहे.

११ वर्षांपासून ह.भ.प. गणेश महाराज वारकरी आश्रमात समाधी सोहळ्याचे आयोजन
मागील ११ वर्षापासून श्री ह.भ.प. गणेश महाराज भागूजी फड वारकरी आश्रम ट्रस्ट, आळंदी येथे माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. सोहळ्यात आलेल्या भाविकांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह किर्तन भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी वारकरी आश्रमात माऊलींच्या ७२३ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने माऊलींच्या समाधी सोहळ्यात सहभागी होऊन जीवन कृतार्थ करावे, असे आवाहन ट्रस्ट चे संस्थापक ह.भ.प. गणेश महाराज यांनी केले आहे.