स्टेट बँकेची खासदार गांधींकडून झाडाझडती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – खाते उघडण्यास फॉर्म न देणे, खाते उघडण्यास टाळाटाळ करणे, पासबुक प्रिंट करून न देणे, मुद्रा लोन माहिती न देणे, लोन न देणे आदी सर्वसामान्य ग्राहकांना धूळफेक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश आज खासदार दिलीप गांधी यांनी लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथे केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, लोणी येथील स्टेट बँकेच्या गलथान, मनमानी करभराविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि साप्ताहिक वादळी स्वातंत्र्य चे संपादक जितेंद्र पितळे यांनी बँकेसमोर आज बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते. याबाबतची माहिती खासदार दिलीप गांधी यांना समजल्यानंतर त्यांनी स्वतः या ठिकाणी जाऊन बँकेच्या शाखाधिकारी यांना मुद्रा कर्ज किती वाटप केले ? मुद्रा कर्जाचे किती प्रकार आहेत ?  कोणत्या प्रकारचे मुद्रा कर्ज किती लोकांना वाटप केले आहे ? किती लोकांचे मुद्रा कर्ज अर्ज आले आहेत ? याबाबतची माहिती खासदार गांधी यांनी शाखाधिकारी यांना विचारली परंतु त्यांना यातील एकही माहिती व्यवस्थित देता आली नाही. तसेच खाते उघडण्याचा अर्ज मागितला असता तो पण सापडला नाही. त्यामुळे बँकेचा गलथान आणि अनागोंदी कारभार लगेच उघड झाला. त्यावर गांधी यांचा पारा चढला. त्यांनी थेट नगर येथील वरच्या कार्यालयास फोन करून याबाबतची माहिती कळविली आहे.

याबाबत वरिष्ठ कार्यालयाने या बाबीची गंभीर दखल घेऊन सेवेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आज बाजार दिवस असल्याने लोणी येथील बँकेत अनेक लोकांची गर्दी झालेली होती आणि अशातच खासदार गांधींनी बँकेची झाडाझडती घेतल्याने ग्राहक वर्गातून खासदार गांधी आणि जितेंद्र पितळे यांना धन्यवाद देण्यात येत आहे. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या सुवर्णाताई पाचपुते, भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक,संतोष जठार, अनंता पवार, सुहास काकडे आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.