शिक्षकांनंतर आता सर्वांना ड्रेसकोड, जाणून घ्या कोणा-कोणाचा आहे समावेश ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employee) आता ड्रेस कोड (Dress Code) लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत त्याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. त्यामुळे मंत्रालयातील सर्व विभाग तसेच सर्व शासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सल्लागार यांना आता ड्रेसकोडमध्ये कार्यालयात उपस्थित रहावे लागणार आहे. तसा आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने मंगळवारी (दि.8) काढले आहे.

कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसात प्रतिमा मलीन होते. त्यामुळे शासनाने ड्रेस कोडची नियमावली तयार करुन तसे परिपत्रक काढले आहे. शासनाने काढलेले हे परिपत्रक सर्व शासनाच्या सर्व विभागांना पाठवण्यात आले आहे. तसेच राजकीय पक्षांना देखील पाठवण्यात आले आहे. या आदेशात कार्यालयात जीन्स पॅन्ट, टी शर्टचा वापर करू नये, तसेच कार्यालयात स्लिपरचाही वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मंत्रालय आणि त्यातंर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयातून शासनाचा कारभार चालतो. शासनाची ही सर्व कार्यालये ही जनमानसातील प्रतिनिधी म्हणून पाहण्यात येतात. या कार्यालयात खासदार, आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, संस्था प्रतिनिधी इत्यादी त्यांच्या कामासाठी भेट देतात.

सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. अशा परिस्थितीत जर अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदरीत कामकाजावरही होतो. या सर्व बाबी विचारात घेता मंत्रालयात तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा याबाबत पुढील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

1. गडद रंगाचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करु नयेत. तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स, टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करु नये.
2. खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.
3. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सॅन्डलचा वापर करावा.
4. कार्यालयामध्ये स्लिपरचा वापर करु नये.
5. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. जसे महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडिदार कुर्ता, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पँट/ट्राऊझर पँट असा पेहराव करावा.
6. परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी.
7. कार्यालयीन वेळेत ओळखपत्र दर्शनी भागावर धारण करावे.