दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर असून पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्यापर्यंतच्या तक्रारींची संख्या वाढत आहे. तसेच पाण्याअभावी शेतीतील पिकांचेही प्रश्न गंभीर बनला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी  राज्यात दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पाऊस ( क्लाऊड सीडिंग)  पाडण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. ‘द क्लाऊड सीडिंग’च्या योजनेसाठी  ३० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. यापूर्वी सरकारने प्रथमच २०१५ साली ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात मराठवाड्यात एकूण ४७ फ्लाईट्सच्या सहाय्याने मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा प्रयोग केला होता. या प्रयोगासाठी सरकारने २७ कोटी खर्चून एकूण १३०० मिमी पावसाची नोंद केली होती.

राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी क्लाऊड सीडिंगच्या तरतुदीसाठी मदत व पुनर्वसन विभागाचा वित्त विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या तरतुदीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीने टेंडर्स मागवले जाणार आहेत. दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राला यंदाही दुष्काळाच्या झळा बसण्याची शक्यता आहे. कारण यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कृत्रिम पाउस म्हणजे काय ?

रॉकेटचा किंवा विमानाचा वापर करुन हा पाऊस पाडला जातो.  पाऊस पाडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते. अशावेळी ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केलं की त्याचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं. क्लाउड सिडिंगमध्ये हेच मुलभूत तत्त्व वापरण्यात येत आहे.