दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर ग्रेटा थनबर्ग म्हणाली…

दिल्ली : वृत्तसंस्था –  पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. भारतातील शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटमुळे ग्रेटा थनबर्ग विरोधात हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या ट्विटनंतर ग्रेट थनबर्गने भारतातील शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे ट्विट केलं होतं.

दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गच्या विरोधात गुन्हेगारी कट रचणं आणि वैरभाव निर्माण करणे असे आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यानंतर तिने ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, मी शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांच्या शांतीपूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कुठलाही द्वेष किंवा मानवी हक्काच्या उल्लंघनामुळे यात बदल होणार नाही, असे ग्रेटा थनबर्गने म्हटले आहे.

दरम्यान, रिहाना, ग्रेटा थनबर्गच्या ट्विटनंतर देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. देशात दोन गट पडल्याचे चित्र आहे. बॉलिवू़डसह क्रिकेट जगतातील अनेकांनी भारतातील आंदोलनाबद्दल ट्विट करणाऱ्या परदेशी सेलिब्रिटींविरोधात जाहीर भूमिका घेतली आहे. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda या हॅशटॅग अंतर्गत अनेकांनी देशाच्या एकजूटीची हाक दिली आहे.