एसटीच्या सॅनिटरी पॅडची योजना रखडली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महिला आणि तरुणींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावे, यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकात फेब्रुवारी २०१८ मध्ये व्हेंडिंग मशिन सुरू करण्यात आले होते. हे व्हेंडिंग मशिन राज्यातील तीसपेक्षा जास्त महत्त्वाच्या आगारांत या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, फेब्रुवारी २०१९ मध्ये आढावा घेतला असता अधिकाऱ्यांचा अकार्यक्षमपणा आणि वरिष्ठांच्या दुर्लक्षपणामुळे महामंडळाच्या या आरोग्यदायी योजनेला खीळ बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आजही महिला व तरुणी एसटीतून मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यांच्यासह स्थानिक महिलांना सॅनिटरी पॅड योजनेचा लाभ घेता यावा यासाठी मुंबईतील कुर्ला-नेहरूनगर आणि परळ आगारांसह राज्यातील एसटी आगारे आणि प्रमुख थांब्यावर व्हेंडिंग मशिन बसवण्यात येणार होते. असे राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले होते.

तसेच टप्प्याटप्याने सर्व आगारांत हे मशिन बसवण्याचे नियोजन होते. पहिल्या टप्प्यात ३० एसटी आगारांसाठी मंजुरी देण्यात आली होती. तसेच संबंधित आगारव्यवस्थापकांना मशिनबाबतचा प्रस्ताव मुख्यालयात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी असा प्रस्ताव न पाठवल्याने व महाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्यांनीही या योजनेचे गांभीर्य लक्षात न घेतल्याने ही योजना रखडल्याचे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.