खुशखबर ! 52 रुपयांनी ‘स्वस्त’ झालं घरगुती गॅस सिलेंडर, नवीन दर आजपासून लागू

वृत्त संस्था – होळीच्या पूर्वी घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर (14.2 किलोग्रॅम) 52.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आतापर्यंत 893.50 रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर मार्च महिन्यापासून 841 रुपयांना मिळेल. फेब्रुवारीच्या मध्यावर यामध्ये 144.50 रुपयांची वाढ झाली होती. नवे दर रविवारी सकाळपासून लागू झाले आहेत.

मासिक रेट रिव्हीजनमध्ये तेल कंपन्यांनी कमर्शियल सिलेंडरच्या (19 किलोग्रॅम) दरातही 84.50 रुपयांची कपात केली आहे. व्यावसायिकांना कमर्शियल सिलेंडरसाठी आता 1465.50 रुपये मोजावे लागतील. पाच किलो वाला छोटू सिलेंडर सुद्धा 18.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. छोटू सिलेंडर आता 308 रुपयांना पडेल.

325.71 रुपयांचे अनुदान

घरगुती गॅस सिलेंडरचे (विना अनुदानित) दर उतरल्यानंतर आता ग्राहकांच्या खात्यामध्ये 325.71 रुपये अनुदान जमा होईल. म्हणजे अनुदानित सिलेंडर ग्राहकांना सुमारे 515 रुपयांना पडेल.

12 सिलेंडरवर अनुदान देते सरकार

सध्या सरकार एक वर्षात प्रत्येक घरासाठी 14.2 किलोग्रॅमच्या 12 सिलेंडरवर अनुदान देते. जर यापेक्षा जास्त सिलेंडर हवे असतील तर ते बाजार भावाने खरेदी करावे लागतात. सरकार दरवर्षी 12 सिलेंडरवर अनुदान देते, त्याची किंमतही दर महिन्याला बदलत असते. सरासरी अंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि परदेशी चलन दरातील बदलावर अनुदानाची रक्कम ठरते.