युरोपीय देशात देखील स्ट्रेनचा संसर्ग, SA सह ऑस्ट्रेलियामध्ये आढळले रूग्ण, विमानसेवांना स्थगिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  काेविड १९ विषाणूचा अधिक वेगाने पसरणारा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. केवळ ब्रिटनचा नाही तर इतर देशांमध्येही हा स्ट्रेन आढळल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतासह युराेपसह काही देशांमधील विमानसेवा तात्पुरती स्थगित केली आहे. भारतात ब्रिटनवरून आलेल्या दोघे कोरोनाबाधित आढळून आले आहे त्यांना विलगीकरणकक्षात ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, लंडनसह दक्षिण ब्रिटनमध्ये काही भागांत या विषाणूमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास आले हाेते. त्यानंतर, युराेपमधील आइसलँड, डेन्मार्क, बेल्जियम, इटली, स्वीडन आणि नेदरलँड या युराेपीयन देशांमध्ये नवा स्ट्रेन आढळला आहे. त्यामुळे अनेक देशांनी युराेपमधील विमानसेवा स्थगित केली आहे. फ्रान्समध्येही नव्या स्ट्रेनचा संसर्ग झाल्याचा संशय आहे, परंतु चाचण्यांमध्ये तसे निष्पन्न झालेले नाही. ब्रिटनमधून ऑस्ट्रेलियामध्ये गेलेल्या दाेन प्रवाशांमध्ये नवा स्ट्रेन आढळला हाेता. त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

आफ्रिकेतील विषाणू वेगळा ?
नव्या स्ट्रेनमुळे ब्रिटनमधील परिस्थिती चिंताजन झाली आहे. इतर युरोपियन देशात तशीच स्थिती आहे. दक्षिण आफ्रिकेतही नवा स्ट्रेन आढळला आहे, परंतु हा विषाणू ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनपेक्षा वेगळा असल्याचा दावा दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना १९ विषाणूंवर विकसित करण्यात आलेली लस नव्या स्ट्रेनवर प्रभावी ठरते का, याबाबत दक्षिण आफ्रिकेमध्ये संशाेधन सुरू करण्यात आल्याचे समोर आले आहे.

भारतात आपत्कालीनस्थितीत कोरोना लसीच्या वापरास मंजुरी देणार
भारतात जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू केली जाईल, अशी घोषणा सरकारने केली आहे. दुसरीकडे, कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार आपत्कालीनस्थितीत कोरोना लसीचा वापर करण्यास परवानगी देण्याची शक्यता दिसते. भारत द्विस्तरीय योजनेवर काम करीत आहे. त्याुनसार फायझरची लस आयात करण्यासोबत सीरमच्या ‘अस्ट्राझेनेका’च्या लसीचा वापर करण्यास मंजुरी दिली जाऊ शकते. असे संकेत मिळू लागले आहे. भारतीय औषधी महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) आपत्कालीन स्थितीत लसीचा वापर करण्यासाठी फायझर आणि सीरमने मंजुरी मागितलेली आहे. तथापि, डीसीजीआयने फायझर आणी सीरम इन्स्टिट्यूट (पुणे) आणि भारत बायोटेककडे (हैदराबाद) काही अतिरिक्त माहिती मागवली आहे. कंपनीने अंतिम माहिती सादर केल्यानंतर ब्रिटनकडून ऑक्स्फर्डच्या लसीला २८ किंवा २९ डिसेंबर रोजी आपातस्थितीत वापर करण्यासाठी मंजुरी दिली जाऊ शकते. ब्रिटनची मान्यता मिळाल्यानंतर कोविशिल्ड लसीला भारताकडूनही मंजुरी दिली जाईल.