दूध भाववाढीसाठी नेवासा येथे चक्काजाम

नेवासा : पोलिसनामा ऑनलाईन

दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी नेवासा येथे प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले .नगर- औरंगाबाद महामार्गावरील नेवासाफाटा येथे सुमारे पाऊण तास चाललेल्या रास्तारोको व चक्काजाम आंदोलन प्रसंगी नेवासा तालुका परिसरातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दुधाला भाववाढ मिळेल असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप त्याची पूर्तता मात्र झाली नाही. जानकर हे थापा मारणारे मंत्री असल्याची टीका प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अतुल खुपसे यांनी केली.यावेळी निवासी नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दुधाने अंघोळ घालण्यात आली. रास्तारोको व चक्काजाम आंदोलन प्रसंगी नेतृत्व करणारे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी सरकार दूध भाव वाढीबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत भाव वाढीबाबत सरकारने वेळीच लक्ष न घातल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विनोदसिंह परदेशी, पी.आर.जाधव, शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले, संभाजी ब्रिग्रेडचे गणेश चौघुले, नितीन पानसरे, अजित धस, श्याम ढोकने, नागेश आघाव, रघुनाथ अरगडे, विजय म्हस्के, प्रकाश बेरड, संगीता शर्मा, संदीप डौले, प्रवीण कदम, महेश पठारे, अमोल कातुरे, रउफ पटेल, भाऊसाहेब शेळके पाटील, विकी मोरे, नितीन पुंड, सुरेश शेळके, नानासाहेब भारस्कर, सोमनाथ सांगळे, संदीप पाखरे, अमोल जोगदंड यांच्यासह प्रहार संघटनेचे कार्यकर्ते,पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.