स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी पुण्यात परतू लागले

पोलीसनामा ऑनलाईन टीम  पुणे: कोरोना महामारीमुळे आठ महिने सर्वत्र लॉकडाऊन होता. जेवणाचा प्रश्‍न तसेच वाढती रूग्ण संख्या या भितीमुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्याशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे पुणे शहरात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेसाठी देशातील विविध भागांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या मूळ गावी जाण्याची वेळ आली होती. परंतु परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. शहरात विद्यार्थ्यांची गजबज पुन्हा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनीही सध्या पुण्यातच मुक्काम केला आहे.

पुणे विद्येचे महेर घर म्हणून ओळखले जाते. विविध क्‍लासेस आणि अभ्यासाचे वातावरण,
सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध, योग्य मार्गदर्शन तसेच करिअरशी संबंधित विविध पर्याय उपलब्ध यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा नेहमीच पुण्याकडे राहिला आहे. अचानक लॉकडाऊन पुकारल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय विअशल थोरातला लॉकडाऊनमुळे मंचरजवळील वाडा या आपल्या गावी जावे लागले. सर्व पुस्तके होस्टेलवरच राहिली. गावाता वाचनालयाची सुविधापण उपलब्ध नसल्याने विशालला परीक्षेची तयारी कशी करायची हा प्रश्‍न पडला. गावी अभ्यासाचे वातावरण नाही आणि त्यात इंटरनेट, वाचनालयसारख्या इतर सुविधांच्या कमतरतेमुळे परत पुण्याला येण्याचा मार्ग निवडल्याचं तो सांगतो.

सध्या अनलॉकमुळे सर्व काही पुन्हा सुरू झाले असून शहरात विद्यार्थ्यांची गजबज पुन्हा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. तर विशालसारखे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात राहत असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता ते विद्यार्थी पुन्हा परंतु लागले आहेत. कोरोनामुळे दिल्लीतील वातावरण पाहता दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनीही सध्या पुण्यातच मुक्काम करून विविध परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

शहरात न येता माहिती मिळणे अशक्य
ग्रामीण भागात आजहि सुविधांची वानवा आहे. सध्या परीक्षेच्या तारखा आल्या नाहीत, त्यामुळे क्‍लासेस लावून परीक्षेची तयारी सुरु केली आहे. तसेच परीक्षा होणार आहे की नाही याची माहती घेणे पण गरजेचे आहे. गावकडे थांबल्यावर ते शक्‍य होणार नाही म्हणून पुन्हा शहरात आलो आहे. असे एका स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा विद्यार्थी निलेश आंबरे याने सांगितले .

४० टक्के विद्यार्थी परतले
तारखा निश्‍चित न झाल्यामुळे स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. तसेच सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना शहराची ओढ आहे. शहरात सध्या ४० टक्के विद्यार्थी परत आले आहेत. पुढील वर्षाच्या परीक्षेची तयारी तसेच अभ्यासाबरोबर करिअरसाठी इतर संधी अशा दोन कारणांमुळे हे विद्यार्थी शहरात आल्याचे एमपीएससी स्टूडंट्‌स राईटचे अध्यक्ष किरण निंभोरे यांनी सांगितले.