चंद्रपूर : प्रेमीयुगलांची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

चंद्रपूरः पोलीसनामा ऑनलाईन – प्रेमीयुगलांनी रेल्वेखाली उडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरोरा शहरात सोमवारी (दि. 1) उघडकीस आली. मुलगी अल्पवयीन असल्याने घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने दोघांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

आकाश निलकंठ मेश्राम ( वय, 22, रा. गोविंदपूर, जि. वर्धा), मयुरी (वय 17 रा. भद्रावती जि. चंद्रपूर ) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगलांची नावे आहेत.

वरोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरोरा शहरातील प्रसिद्ध महाकाली नगरी जवळील रेल्वे लाईनवर दोघांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रेल्वे गार्डने स्टेशन मास्टरांना माहिती दिल्यानंतर रेल्वे विभागाकडून वरोरा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांना घटनास्थळी दुचाकी आढळून आली असून ती ताब्यात घेतली आहे. तर काही अंतरावर युवक-युवतीचे कटलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले. पोलिसांना आधारकार्डवरून तरुणाची ओळख पटवता आली. तर युवतीजवळ काहीही आढळून आले नाही. शेवटी युवतीच्या डायरीमधील नंबरवरून युवती भद्रावती येथील असल्याचे कळताच वरोरा पोलिसांनी भद्रावती पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी केलेल्या तपासावरून युवती मेहता हॉस्पिटल मागे भद्रावती येथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. मागील अनेक दिवसांपासून आकाशचे मयुरीवर प्रेम होते. पण मुलगी अल्पवयीन असल्याने लग्नाला विरोध होत असल्याने त्यांनी आत्महत्याचा निर्णय घेतला असावा, अशी माहिती पुढे आली आहे. वरोरा पोलीस तपास करत आहेत.