भाजप खासदार अभिनेते सनी देओल यांना Y दर्जाची सुरक्षा ! जाणून घ्या कारण

पोलिसनामा ऑनलाईन – भाजप खासदार अभिनेते सनी देओल (Sunny Deol) यांना वाय दर्जाची सुरक्षा ( Y level security) देण्यात आल्याची माहिती समजत आहे. आता सनी सोबत कायमच केंद्रीय सुरक्षा दलाची टीम असणार आहे. गृहमंत्रालयाशी संबंधित सूत्रांचं म्हणणं आहे की, आयबीचा रिपोर्ट आऐणि सनी देओल यांना घेऊन थ्रेट परसेप्शनच्या आधारावर ही सुरक्षा देण्यात आली आहे.

सनी यांना जी वाय दर्जाची सुरक्षा मिळाली आहे त्यात त्यांच्या सोबत 11 जवान राहणार आहेत आणि 2 SPO असणार आहेत. सनी देओल पंजाबच्या गुरदासपूरचे खासदार आहे. गुरदासपूर भारत आणि पाकिस्तान सीमेच्या जवळ आहे. त्यामुळं त्यांना कायमच धोका असतो. सनी यांची सुरक्षा अशा वेळेत वाढवली आहे जेव्हा पंजाबमध्ये कृषी कायद्यांना जोरदार विरोध केला जात आहे. सर्वांनाच माहित आहे की, शेतकरी संघटनांनीही गेल्या काही दिवसात भाजप नेते आणि मंत्र्यांना घेराव घालण्याबद्दल भाष्य केलं होतं.

सध्या भाजपला पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतातील इतर राज्यात विरोधाचा सामना करावा लागत आहे. सनी देओल हे पंजाबचेच आहेत. अनेक दिवस त्यांनी शेतकरी आंदोलनावर मौन साधलं होतं. यामुळं त्याच्यांवरून अनेक सवाल उपस्थित केले जात होते. परंतु नंतर मात्र त्यांनी वर भाष्य केलं होतं.

मी आणि माझा पक्ष शेतकऱ्यांसोबत आहोत आणि कायम त्यांच्या पाठीशी असेन. आपल्या सरकारनं कायम शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे. त्यामुळं मला विश्वास आहे, सरकार त्यांच्याशी नीट चर्चा करून योग्य तो तोडगा काढेल असं ते म्हणाले होते.