‘कोरोना’ टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतरही खालावली ‘सुपरस्टार’ रजनीकांत यांची प्रकृती ! रुग्णालयात दाखल

पोलिसनामा ऑनलाइन – साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची प्रकृती खालावली असून त्यांना हैद्राबादमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आगामी सिनेमा अन्नाथेची गेल्या 10 दिवसांपासून हैद्राबादमध्ये शुटींग सुरू होती. परंतु क्रूमधील 8 लोकांना कोरोनाची लागण झाल्यानं शुटींग थांबवण्यात आली होती. 22 डिसेंबर रोजी रजनीकांत (Rajinikanth) यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. परंतु त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं होतं.

रजनीकांत यांना हैद्राबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटलनं दिलेल्या निवेदनात सांगण्यात आलंय की, रजनीकांत यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळून आलेली नाहीत. परंतु रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास आढळून आला आहे. त्यांचा रक्तदाब कमी होईपर्यंत तपासणी केली जाणार आहे. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवलं जाणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अन्नाथे सिनेमाचं शुटींग आता पुढं ढकलण्यात आलं आहे. याचा निर्मात्यांना मोठा फटका बसणार आहे असं दिसतंय. रजनीकांत शुटींग थांबल्यानंतर पुन्हा चेन्नईला जाणार होते. परंतु त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना हैद्राबादमधील रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. हैद्राबादला रामोजी फिल्म सिटी येथे सिनेमाची शुटींग सुरू होती. 45 दिवसांच शेड्युल होतं. खबदारी म्हणून निर्मात्यांनी इनडोअर शुटींगचा पर्याय निडवला होता.