हायकोर्टाच्या निर्णय लेखनावर SC ची नाराजी, म्हणाले – ‘हा निर्णय वाचून डोक्याला बाम लावण्याची वेळ आली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाच्या लेखन पद्धतीवर सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदर निर्णय वाचल्यानंतर डोक्याला बाम लावण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया या प्रकरणी सुनावणी करणाऱ्या खंडपीठाच्या न्यायाधीशांनी दिली आहे. हिमाचल हायकोर्टाने दिलेल्या एका निर्णयावर सुप्रीम कोर्टात न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एम.आर शहा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. यावेळी न्या. शहा यांनी निकाल लेखनावर नाराजी व्यक्त केली. या निर्णयाबाबत काहीही समजत नाही. त्यात मोठी-मोठी वाक्य असून ती कुठे सुरू होतात अन् कुठे संपतात हे समजत नाही. हा निर्णय वाचल्यानंतर मला माझ्यावरच अविश्वास निर्माण झाल्याचेही शहा यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सर्वसामान्यांना समजेल असा सोप्या भाषेत निर्णय लिहलेला असावा. शेवटचा परिच्छेद वाचल्यानंतर मला बाम लावावा लागला. सकाळी 10.10 मिनिटांनी हा निर्णय मी वाचायला सुरु केला अन् 10. 55 मिनिटांनी तो वाचून संपवला. हे वाचताना मी काय भोगल, याची तुम्ही कल्पना करू शकत नाही, असे न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केल आहे. हिमाचल प्रदेशातील एका सरकारी कर्मचाऱ्याशी संबंधित हे प्रकरण आहे. केंद्राच्या औद्योगिक न्यायाधिकरण समितीने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या निर्णयाला त्याने हायकोर्टात आव्हान दिले होते. हायकोर्टाने प्राधिकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याने त्याने सुप्रीम कोर्टात आव्हान दिल आहे. या याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.