चारित्र्याच्या संशयावरून पीडीत महिलेला दिली ‘ही’ शिक्षा

बीडः पोलीसनामा ऑनलाईन – बलात्कार पीडित महिलेच्या चारित्र्यावर संशय (Doubt over character) घेत चक्क ग्रामपंचायतीने तिला गावातून हद्दपार करण्याचा ठराव मंजूर केला आहे. ही धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. हे कमी म्हणून की काय, ग्रामस्थांनी सदर महिलेविरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊनही गोंधळ घातला. तसेच पीडित महिलेला मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. या जमावाच्या तावडीतून सदर पीडित महिला आणि तिची मुले कसाबसा जीव वाचवून बाहेर पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षापूर्वी पीडित महिलेवर गावातील चार जणांनी बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपींविरोधात खटला चालून न्यायालयाने संबंधितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र ही बाब गावकऱ्यांना रुचली नव्हती. या प्रकरणात न्यायालयाने पीडितेच्या बाजूने न्याय दिल्यानंतरही गावातून सदर महिलेला त्रास देण्यास सुरुवात झाली. धक्कादायक बाब म्हणजे गावातील ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवक, सरपंच आदी मंडळीही या महिलेविरोधात उभे राहिले आहेत. सदर महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन ग्रामपंचायतीने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना गावातून हाकलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.