‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद होणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वराज्यरक्षक संभाजी ही टीव्ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. गेल्या दोन वर्षांपासून गाजणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समजत आहे. फेब्रुवारी महिन्यात या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारीत केला जाणार आहे. मालिकेत ज्याप्रमाणे घटनाक्रम सुरू आहे ते पाहिल्यानंतर इतिहासाच्या जाणकारांमध्ये मालिका संपणार असल्याची चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवटचा एपिसोड नुकताच गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये शुट करण्यात आला आहे. येत्या 14 तारखेला पुण्यात या मालिकेच्या शेवटच्या भागातील काही सीन्स शुट केले जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत होणार आहे. दरम्यान या मालिकेचा शेवट कसा असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

2018 मध्ये संभाजी मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारीत करण्यात आला होता. डॉ. अमोल कोल्हेंनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका, शंतनू मोघेनं साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तसेच प्राजक्ता गायकवाडनं साकारलेली येसूबाईंची भूमिका चाहत्यांना खूपच आवडली आहे. प्रेक्षकांचं मोठं प्रेम या मालिकेला मिळालं आहे. परंतु ही मालिका बंद होणार हे ऐकल्यानंतर अनेकांनी खंत व्यक्त केली आहे.