‘ब्लॅक मनी’वाल्यांचे धाबे दणाणले ; स्विस बँकेने केला ‘या’ ११ भारतीयांच्या नावाचा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्विस बँकेत खाते असणाऱ्या भारतीयांची माहिती देण्याचे काम आता स्विस बँकेने सुरू केले आहे. मागील आठवड्यात बँकेने यासंबंधी ११ खातेदारांना नोटीस बजावली आहे. येथील प्राधिकरणाने मार्चपासून आतापर्यंत सुमारे २५ भारतीयांना नोटीस जारी केली असून भारत सरकारला त्यांची माहिती देण्याविरूद्ध आपील करण्यासाठी शेवटची संधी दिली आहे. स्विस बँकेने या कामाला गती दिल्याने काळापैसा स्विस बँकेत ठेवणाऱ्या भारतीयांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
स्विस बँकही आपल्या खातेदारांची माहिती गोपनिय ठेवण्यासाठी विश्वसनिय बँक म्हणून जगभरात ओळखली जाते. परंतु, करबुडव्यांच्या प्रकरणात जागतिकस्तरावर सामंजस्य झाल्याने आता ही गोपनियता राहिलेली नाही. बँकेने काळापैसा ठेवणाऱ्या भारतीयांची माहिती देण्यासंदर्भात भारत सरकारशी सामंजस्य केले आहे. भारतासह अन्य दोन देशांशी असेच सामंजस्य करण्यात आले आहे.

स्विस बँकेच्या परदेशी ग्राहकांची माहिती देणाऱ्या येथील फेडरल टॅक्स विभागाने जारी केलेल्या सुचनेनुसार, स्विस बँकेने काळापैसा ठेवणाऱ्या खातेदारांची माहिती संबंधित देशांना देण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू केली आहे. विशेष म्हणजे मागील काही आठवड्यापासून भारताला याबाबत माहिती देण्याच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. मात्र स्विस बँकेने सार्वजनिकरित्या जाहीर केलेल्या माहितीत काळापैसा असणाऱ्या ग्राहकांची पूर्ण नावे जाहीर न करता केवळ नावांची सुरूवातीची अक्षरे जाहीर केली आहेत. तसेच ग्राहकांचे राष्ट्रीयत्व, जन्मदिनांकाची माहिती देण्यात आली आहे. बँकेने २१ मेरोजी ११ भारतीयांना नोटिस जारी केली आहे.

स्विस बँकेने ज्या दोन भारतीयांचे पूर्ण नाव जाहीर केले आहे त्यामध्ये मे १९४९ मध्ये जन्मलेल्या कृष्ण भगवान रामचंद्र आणि सप्टेंबर १९७२ मध्ये जन्मलेल्या कल्पेश हर्षद किनारीवाला यांची नावे आहेत. मात्र, त्यांच्याबाबत आणखी माहिती उपलब्ध झालेली नाही. ज्या भारतीयांच्या नावाची सुरूवातीची अक्षरे जाहिर केली आहेत त्यामध्ये १९४४ साली जन्मलेले एएसबीके, ९ जुलै १९४४ रोजी जन्मलेले एबीकेआय, २ नोव्हेंबररोजी जन्मलेल्या श्रीमती पीएएस, २२ नोव्हेंबररोजी जन्मलेल्या श्रीमती आरएएस, २७ नोव्हेंबर १९४४ ला जन्मलेले एपीएस, १४ ऑगस्टरोजी जन्मलेल्या श्रीमती एडीएस, २० मे १९३५ला जन्मलेले एमएलए, २१ फेब्रुवारी १९६८रोजी जन्मलेले एनएमए आणि २७ जून १९७३ रोजी जन्मलेले एमएमए यांच्या नावांचा समावेश आहे.

या नोटीसमध्ये म्हटले आहे की, संबंधित ग्राहक किंवा त्यांच्या प्रतिनिधीने आवश्यक ते कागदपत्र आणि पुरावे घेऊन ३० दिवसांच्या आत अपिल करण्यासाठी उपस्थित रहावे. दरम्यान, स्विस बँकेने ही कारवाई सुरू केल्याने भारतात खळबळ उडाली असून काळापैसावाल्यांचे धाबे दणाणले आहे.