‘हे’ आहेत जीवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसची लक्षणं, जाणून घ्या कसा ‘बचाव’ कराल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरस आता संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनला आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये कोरोना व्हायरसच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोघांना मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ८३० लोकांना संक्रमण झाले आहे. चला जाणून घेऊया कोरोना व्हायरस नेमके काय आहे आणि यापासून संरक्षण कसे करावे…

भारतीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारी म्हणून दिल्ली, मुंबई आणि कोलकाता विमानतळांवर चीनहून येणार्‍या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची थर्मल स्कॅनरने तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात विमानतळांवर घोषणा देखील करण्यात येत आहेत. चीनकडे जाणाऱ्या आणि चीनवरून येणाऱ्या प्रवाशांसाठी समुपदेशन जारी करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. कारण अशी घोषणा झाल्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न तीव्र होतील.

काय आहे कोरोना व्हायरस :
कोरोना व्हायरस विषाणू प्रवर्गाशी संबंधित आहे. हा व्हायरस उंट, मांजर आणि वटवाघूळ यांच्यासह अनेक प्राण्यांमध्ये प्रवेश करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसचा संबंध सी-फूडशी येतो.

काय आहेत लक्षण :
कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घशात दुखणे, श्वास घेण्यात अडचण, ताप यासारखी सुरुवातीची लक्षणे दिसतात. यानंतर, ही लक्षणे न्यूमोनियामध्ये बदलतात आणि मूत्रपिंडांना नुकसान करतात. फुफ्फुसात एक गंभीर प्रकारचा संसर्ग होतो.

आतापर्यंत या व्हायरसपासून मुक्त होण्यासाठी कोणतीही लस तयार करण्यात आलेली नाही. परंतु लक्षणांच्या आधारे डॉक्टर त्याच्या उपचारामध्ये इतर आवश्यक औषधे वापरत आहेत. तथापि, आता यावर औषध देखील शोधले जाणार आहे.

हे आहेत प्रतिबंधक उपाय :

  1. आपले हात साबणाने आणि पाण्याने किंवा अल्कोहल युक्त हॅंड रबने स्वच्छ करा.
  2. खोकला आणि शिंकताना आपल्या नाकाजवळ आणि तोंडाजवळ रुमाल धरा.
  3. ज्यांना सर्दी अथवा फ्ल्यू सारखे लक्षण असतील त्यांच्यापासून लांबच रहा.
  4. याव्यतिरिक्त घरात चांगले अन्न शिजवावे, मांस आणि अंडी शिजवल्यानंतरच खावे. प्राण्यांच्या संपर्कात येणे टाळावे.

एका रिपोर्टनुसार जर्मनीच्या काही वैज्ञानिकांनी त्याची लस तयार करण्यासाठीच्या फॉर्मुल्याचा पहिला टप्पा ओलांडला आहे. लवकरच याच्या अधिकृत औषधाची घोषणा केली जाऊ शकते.

भारताच्या आरोग्य सचिव प्रीती सुदान म्हणाल्या की, डब्ल्यूएचओच्या सल्लामसलतीनुसार परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. जागतिक स्तरावर या व्हायरसचा मानवापासून मानवाला होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण कमी आहे.

आरोग्य मंत्रालयाने प्रयोगशाळेतील तपासणी, पाळत ठेवणे, संसर्ग निवारण व नियंत्रण (आयपीसी) आणि जोखीम संप्रेषण यासंबंधित सर्व आवश्यक सूचना दिल्या आहेत. यासह समुदाय देखरेखीसाठी एकात्मिक रोग पाळत ठेव कार्यक्रम (आयडीएसपी) तयार केला गेला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like