मनसुख हिरेन हत्या प्रकरण ! ठाण्यातील ‘तो’ पोलिस अधिकारी आता NIA च्या रडारवर

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन  – स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने आतापर्यंत सचिन वाझेसह मुंबई पोलीस दलातील काही पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.अटकेचे हे सत्र अद्यापही सुरू असून आता ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकवर कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान निलंबित पोलीस अधिकारी सुनील माने याच्या खासगी चालकाकडे पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकाने वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मदत केल्याचा संशय आहे. वाझेला २० जिलेटिनच्या कांड्या पुरवणे आणि हिरेन यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा एनआयएला संशय आहे. अन्य आरोपींच्या जबाब व काही पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे. येत्या दोन तीन दिवसात या पोलीस निरीक्षकाकडे चौकशी करण्यात येणार आहे सहभाग सिद्ध झाल्यास त्यांनाही अटक करण्यात येईल असे तापसी अधिकाऱ्यांनी सांगितले.

अटकेत असलेल्या सुनील मानेकडून काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तसेच बुधवारी माने याच्या खासगी चालकाकडे पुन्हा चौकशी करण्यात आली. २५फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत तो मानेसोबत किती वेळ होता, तो कोणाकोणाला भेटला याबाबत माहिती घेण्यात आली. दरम्यान , सोमवारी मानेची लाल रंगाचा इनोव्हा व पोलो कार जप्त केली असून मालाड येथील घर, मरोळतील सशस्त्र दल व अंधेरीतील क्राईम युनिट-११च्या कार्यालयाचीही झडती घेतली आहे.