Talegaon : GM मधील कामगारांना कायम करावे, आ. आबिटकरांची कामगार मंत्र्यांकडे मागणी

तळेगाव दाभाडे/ पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र शासन उद्योग विभागाकडून तळेगाव दाभाडे येथील जनरल मोटर्स इंडिया प्रा. लि. ही कंपनी बंद करण्यास परवानगी मिळण्यापूर्वी कामगारांना त्यांची कामे बंद करण्याची शेवटची तारीख दर्शवणारी नोटीस कंपनी व्यवस्थापनाने कंपनीमध्ये लावली. यामुळे कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात भीतीचे व भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी या संदर्भात कामगार व राज्य उत्पादन शुक्ल मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून, कंपनीतील 1578 कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम ठेवण्याबाबत संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.

जनरल मोटर्सचा तळेगाव येथील कारखाना 17 जानेवारी 2020 रोजी चीनमधील ग्रेट वॉल मोटर्सला कामगारांशिवाय विकण्यासंदर्भातील करार दोन्ही कंपन्यांनी केला होता. त्यास आपण 16 जून 2020 रोजी च्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ग्रेट वॉल मोटोर्स सोबत MOU करून दुजोरा दिला होता. GM ने शासन दरबारी कंपनी बंद करणेसंदर्भात अर्ज केला. या दोन्ही घटना परस्पर विरोधी आहेत. परिणामी कोरोनासारख्या महामारीच्या काळात कंपनीमधील 1578 कायमस्वरुपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात लक्ष घालून जनरल मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तळेगाव दाभाडे या कंपनीतील 1578 कर्मचाऱ्यांची सेवा कायम ठेवण्याबाबत संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी पत्रातून मंत्री वळसे पाटील यांना केली आहे.