तामिळनाडुत 3 कोटी 21 लाखांची रोकड जप्त; मतदारांना वाटप करण्यासाठी आणली होती Cash

चेन्नई : तामिळनाडुमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुक रंगात येत असून त्यात सर्वांकडून मतदारांना भुलविण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या जाहीरनाम्यात आश्वासनाची खैरात सुरु आहे. त्याचवेळी मतदारांना वाटप करण्यासाठी रोख रक्कमेचा वापर सुरु झाला आहे. निवडणुक आयोगाच्या भरारी पथकाने श्रीविलीपुथूर विधानसभा मतदारसंघात बुधवारी तब्बल ३ कोटी २१ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

२०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांना रंगीत टिव्ही, लॅपटॉप, मोबाईल, मंगळसुत्र, दुभती गाय, मिक्सर इतर अनेक वस्तू देण्याचे आश्वासन अण्णा द्रमुकने दिली होती. यंदा त्यांनी वॉशिंग मशीन, सोलर कुकर, प्रत्येकाला घर बांधून देणार, शैक्षणिक कर्जाची रक्कम माफ अशी आश्वासने दिली आहेत. त्याचवेळी द्रमुकने कोविड रुग्णास ४ हजार रुपये मदत, शैक्षणिक कर्ज माफ व इतर कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे.

पण अशी आश्वासने देऊन मत मिळत नसल्याने मतदारांना देण्यासाठी मतदानाच्या अगोदर मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप होत असते. त्यासाठी ही रोकड जमा करण्यात आली होती. त्याची माहिती मिळाल्यावर निवडणुक आयोगाच्या भरारी पथकाने छापा टाकून ३ कोटी २१ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. तामिळनाडुतील २३४ जागांसाठी एकाच दिवशी ६ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे़