नितेश राणेंचा टोला; म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं काम चांगलं, तेच खरे शिवसैनिक’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसापूर्वी तौत्के चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला. यावरून भाजपचे आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. कोकणातील जनतेनं बाळासाहेबांवर खूप प्रेम केलं. पण उद्धव ठाकरेंनी त्या नात्याचा गैरफायदा घेतला. शिवसेना आणि कोकण हे नातं उद्धव ठाकरेंना कळालं असतं तर कोकणवासियांचा असा अपमान केला नसता. उलट उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे. असा टोला नितेश राणेंनी लागलेला आहे.

नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाबद्दल टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी किमान कोकणाला मदत तरी पाठवली. बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कसा असतो ते त्यांनी दाखवून दिलं. त्यांचे मी आभार मानेन. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडून काहीतरी शिकावं असा सल्ला मी देईल असे त्यांनी म्हटले आहे. पुढे नितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सारखं केंद्राकडे मदतीचं रडगाणं गात बसू नये. जमत नसेल तर सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा, असा जोरदार निशाणा देखील राणे यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, राज्याच्या मुख्यंत्र्यांच्या कपड्याची इस्त्री देखील मोडत नाही. ते आले तसचे परत गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात असा दौरा कुणी पाहिला नसेल. मी याआधी या दौऱ्याला लिपस्टिक दौरा म्हटलं होतं. पण हा तर नुसता पावडर दौरा होता. चेहऱ्याला पावडर लावतो तसा हा दौरा होता, तसेच, मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्याला दौरा कसं म्हणणार? मुख्यमंत्री नुकसान झालेल्या भागात गेले तरी का? नुकसानग्रस्त गावकऱ्यांशी बोलले का? त्यांचे अश्रू तरी पुसले का?, मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष काय बघितलं? असा सवाल देखील नितेश राणेंनी केला आहे.