१ कोटीचे लाच प्रकरण ; तहसीलदारने काढली कुडकुडत एसीबीच्या कोठडीत रात्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुळशी तालुक्यातील जमिनीच्या फेरचौकशीचा अहवाल अनुकुल द्यावा, यासाठी तब्बल १ कोटी रुपयांची लाच घेतलेल्या तहसीलदार सचिन डोंगरे याला थंडीत रात्रभर एसीबीच्या चौकशीत कुडकुडत काढावी लागली.

सापळा कारवाई केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या दुसऱ्या टीमने तातडीने सचिन डोंगरे यांच्या घरावर छापा घातला. त्यात काही कागदपत्रे आणि बँकांच्या लॉकरच्या चाव्या सापडल्या आहेत. या लॉकरमध्ये काय सापडते, याची चौकशी सोमवारी करण्यात येणार आहे. दरम्यान डोंगरे याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे सर्व प्रकरण म्हणजे ज्याच्या चौकश्या पूर्ण झाल्या, त्याची पुन्हा फेरचौकशी करण्याचा आदेश मंत्रालयातून आल्यावर सचिन डोंगरे यांना ही मोठी संधी वाटली होती. तक्रारदार यांच्या कुटुंबाची सामाईक जमीन मुळशी तालुक्यात आहे. ही जवळपास ४५ एकर जमीन असून त्याचा भाव आता शेकडो कोटी रुपये इतका आहे. मात्र, इतके वर्षे या कुटुंबांच्या भावाभावात वाटण्या झाल्या नव्हत्या. त्याच्या चतु:सिमा आखण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे यापूर्वी त्यावर अपिलापासून सर्व प्रकार झाले व त्यानंतर त्याची नोंदणी होण्यासाठी ही फाईल मंत्रालयात गेली होती. तेथील महसुल सचिवाने या सर्व प्रकरणाची फेरचौकशी करण्याचा आदेश देऊन ही फाईल पुन्हा खाली पाठविली. मुळशी तहसीलदार सचिन डोंगरे यांच्याकडे ती आली. त्यांना ही फाईल म्हणजे मोठे घबाड वाटले. जागेची किंमत पाहून डोंगरे यांच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांनी तक्रारदारांना त्यांना अनुकुल असा अहवाल देण्यासाठी १ कोटी रुपयांची मागणी केली.

तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यांनी एका बॅगेत ८५ लाखांच्या नोटांच्या आकाराच्या कोऱ्या कागदाची बंडले ठेवली व त्याच्यावर १५ लाख रुपयांच्या खऱ्या नोटा ठेवल्या. त्या उरवडे रोडवर स्वीकारताना सचिन डोंगरे याला शनिवारी सायंकाळी पकडण्यात आले. त्यानंतर पहाटे पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सापळा कारवाई नंतर डोंगरे यांच्या घरावर छापा घालण्यात आला. एक पथक घराची झडती घेण्याचे काम करीत आहेत. त्याच्या घरात काही संशयास्पद कागदपत्रे व काही बँकांच्या लॉकरच्या चाव्या सापडल्या आहेत. या लॉकरची तपासणी सोमवारी करण्यात येणार आहे.

१ कोटीची लाच घेताना मुळशीचा तहसीलदार अँटीकरप्शनच्या जाळ्यात

‘या’ कारणासाठी तहसिलदार सचिन डोंगरे यांनी स्विकारली १ कोटीची लाच