‘राजकारण हि देशाला लागलेली कोविड पेक्षा घातक कीड”; तेजस्विनी पंडितची पोस्ट व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रात तर स्थिती गंभीर आहे. लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला तरी लसींचा तुटवडा भासू लागला आहे.

रूग्णालयांत पुरेसे बेड नाहीत, पुरेसा ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर औषध नाही, रूग्णवाहिका नाहीत, अशा स्थितीत रूग्णांचे, त्यांच्या आप्तांचे अतोनात हाल होत आहेत. रूग्णांचा आणि मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे. दुसरीकडे काय तर रेमडेसिवीर आणि लसींवरून राजकारण सुरू असलेले पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने कोरोनाची एकूण स्थिती आणि यानिमित्ताने सुरु असलेले राजकारण यावर तिखट शब्दांत तिने एक पोस्ट केली आहे. राजकारण ही कोरोनापेक्षा घातक कीड असल्याचे तिने म्हटले आहे. स्टोरीवर तेजस्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे. “सगळ्यात मोठी ‘कीड’ जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे ‘राजकारण’… ही ‘कीड’ कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वषार्नुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे.

या ‘कीड’पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच….काळजी घ्या,” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त व परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विविध सामाजिक मुद्यांवर ती मतं व्यक्त करत असते. अभिनयाच्या बाबतीतही तिला तोड नाही.

‘अगं बाई अरेच्चा.’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तेजश्रीने करियरला सुरुवात केली. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने ‘गैर’, ‘तु ही रे’, ‘देवा’, ‘ये रे ये रे पैसा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिने यासोबतच ‘तुझं नि माझं घर श्रीमंताचं’, ‘१०० डेज’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तिचा ‘मी सिंधुताई सकपाळ’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.