Coronavirus : पालघरच्या ग्रामीण भागात ‘कोरोना’चे 10 नवीन रुग्ण

पोलीसनामा ऑनलाइन – पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नव्हता. पण बुधवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पालघर तालुक्यातील आठ नागरिकांना तर डहाणू तालुक्यात वैद्यकीय सेवेत असलेल्या दोघांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

काटाळे या गावी वीटभट्टीवर काम करणार्‍या एका कुटुंबातील तीन वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली होती. मात्र त्या मुलीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. काटाळे येथील वीट भट्टी संदर्भात पाच नवीन रुग्ण आढळले असून कासा येथील उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकार्‍यांना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. डहाणू येथे लहान मुलीला कोरोनाची लागण झाल्याने पालघर तालुक्यातील काटाळे, लोवरे, वांदिवली-खरशेत या गावांच्या हद्दी बंद करण्यात आल्या आहेत.

या गावांमध्ये आरोग्य सेवकांच्या मार्फत घरोघरी पाहणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान कासा येथील उपविभागीय रुग्णालय सील करण्याचा आरोग्य विभाग विचार करत आहे. उसरणी गावातील दोन तर सफाळे डोंगरी येथे श्वसनाचा विकार असणार्‍या रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अचानकपणे एकाच दिवसात 10 रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागासाठी प्रशासकीय यंत्रणांसाठी डोकेदुखी वाढणार आहे. या नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील 42 नागरिकांचे नव्याने विलगीकरण करण्यात आले आहे.