मुरादाबाद-आग्रा राज्यमार्गावर 3 वाहनांच्या झालेल्या अपघातात 10 जण ठार

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कुंदरकी पोलीस ठाणे क्षेत्रात मुरादाबाद-आग्रा राज्यमार्गावर एक मिनी बस आणि कँटरमध्ये जोरदार टक्कर झाली. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये शनिवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींना योग्य उपचार मिळावेत असे आदेश दिले आहेत.

मुरादाबाद जिल्हाधिकारी राकेश कुमार यांनी सांगितले की, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य १० ते ११ जण गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्र्यांनी जखमींवर निशुल्क आणि योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राकेश कुमार सिहं आणि एसएसपी प्रभाकर यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस अधिक्षक अमित आनंद हे जिल्हा रुग्णालयात जखमींना पाहण्यासाठी पोहोचले आहेत. त्यांनी सांगितले की, मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस बिलारीहून मुरादाबादला जात होती. अपघात आग्रा हायवेवरील नानपूर गावात झाला आहे. अपघाताचे वृत्त समजताच मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आले आहेत. अधिकतर मृत हे बिलारी पोलीस ठाणे क्षेत्रातील असल्याचे सांगितले जात आहे.