पुण्यात ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी ते विमानाने आले, मात्र ठाण्यातील 1.37 कोटीच्या दरोड्याची झाली उकल; तिघांना विमानतळावरून अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – तीन महिन्यापूर्वी ठाण्यातील वारीमाता गोल्ड ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्यात चोरट्यांनी 1 कोटी 37 लाखांचे सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले होते. या दरोड्याच्या घटनेचा तपास सुरू असताना कासारवडवली पोलिसांनी पाटणा येथून विमानाने मुंबईत आलेल्या तिघांना विमानतळावरून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, या दरोड्यात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातही ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरी करण्याचा त्यांचा डाव होता. त्यासाठी ते आले होते. मात्र वेळीच पकडले गेल्याने पुढील अनर्थ टळला.

सुलतान आबुल शेख, अब्दुल भादू शेख हक, आलमगीर जब्बार शेख (सर्व रा. झारखंड) अशी या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील वारीमाता गोल्ड ज्वेलर्सवर जानेवारी महिन्यात दरोडा पडला होता. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याबाबत परिमंडळ 5 पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सर्व पोलिस ठाण्याना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कासारवडवली पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आरोपींच्या मागावर होते. दरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार यांना सुलतान आबुल शेख, अब्दुल भादू शेख हक, आलमगीर जब्बार शेख हे तीन आरोपी पटना येथून विमानाने मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने या 3 आरोपींना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. वारीमाता गोल्ड ज्वेलर्स दुकानातून तब्बल 1 कोटी 37 लाखांचे सोने, चांदीचे दागिने चोरीला गेल्याच्या प्रकरणात या तिघाही आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.