‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याच्या शाैर्याचे सर्व स्तरातून काैतूक

दिल्लीः वृत्तसंस्था

देशात सध्या अनेक कारणांवरुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली अनेक निरपराध लोकांना लक्ष्य केले जात असताना नैनीतालमध्ये हिंदू- मुस्लीम प्रेमप्रकरणावरुन वाद निर्माण झाला होता. तेथील नागरिकांनी त्या वादाला वेगळेच स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. मात्र एका शीख पोलिस उपनिरीक्षकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिशय शिताफिने चिडलेल्या जनसमुदायापासून एका युवकाचे प्राण वाचवले आहे. गगनदीप सिंग असे या धाडशी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणाचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्‍हायरल झाला असून, माजी न्यायाधीश व प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी सोशल मीडियावरून या हिम्‍मतवाल्या पोलिसाचे अभिनंदन केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नैनीताल जिल्‍ह्यातील रामनगरमधील एका मंदिरामध्ये हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलाला भेटण्यासाठी आले होते. यावेळी मुलगा आणि मुलगी विचित्र आवस्‍थेत सापडले. हा प्रकार स्थानिक लोकांना समजल्यानंतर प्रचंड प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. यावेळी चिडलेल्या जनसमुदायाकडून युवकाला मारहाण करण्याचा डाव आखण्यात आल्याचे एका शीख पोलिस उपनिरीक्षकाला समजले. गगनदीप सिंग यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हा वाद चिघळण्या अगोदरच परिस्‍थितीवर नियंत्रण मिळवले व युवकाला हल्‍लेखोर्‍यापासून वाचवले. तसेच त्या युवकाला पोलीस ठाण्यात आणून कुटूंबियांच्या स्वाधीन केले.

शीख पोलिस उपनिरीक्षकाने अतिशय कुशलतेने चिडलेल्या जमावापासून युवकाला वाचवल्यामुळे सर्वस्तरातून त्या पोलीस अधिकाऱ्याचे अभिनंदन होत आहेत. सिंग यांनी केलेल्या कामगिरीमुळे पोलिस प्रशासनाकडून त्यांना २५ हजार रुपये बक्षीस देखील देण्यात आले आहे.