येरवाड्यातून सुट्टीवर बाहेर आलेल्या आरोपीवर 18 वर्षानंतर गुन्हा दाखल

पुणे: पोलिसनामा ऑनलाइन
 जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना १४ दिवसांच्या संचीत रजेवर  तुरुंगातून बाहेर आलेला आरोपी हा १२ मार्च २००० रोजी फरार झाला होता. सुट्टी संपल्यावर त्याने पुन्हा येरवडा तुरुंगात हरज होणे अपेक्षित होते. मात्र तो हजर झाला नव्हता. त्याबाबत त्याच्यावर कायदेशिर कारवाई सुरु असतानाच १८ वर्षानंतर या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुवापाडा येथील रहिवासी दंडप्पा पुजारी (३७) हा गुन्हेगार हत्येच्या प्रकरणात येरवडा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याने १९९१ मध्ये हत्या केली होती. या प्रकरणात त्याला १९९५ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असतांना पुजारी हा २६ फेब्रुवारीला १४ दिवसांच्या संचित रजेवर बाहेर आला होता. मात्र त्यानंतर तो पुन्हा येरवडा तुरुंगात हजरच झाला नाही. त्यानंतर त्याच्यावर अपेक्षित कारवाई झाली नाही. येरवडा तुरुंग प्रशासनाने या आरोपी विरोधात तब्बल १८ वर्षानंतर अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हा आरोपी ज्या वेळेस फरार झाला होता, त्या वेळेस आरोपीच्या विरोधात फरार झाल्याची न्यायालयीन प्रक्रिया करावी लागत होती. त्या काळात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नव्हती. मात्र २०१३ मध्ये नवीन आदेशानुसार तुरुंगातुन रजेवर गेलेला आरोपी पळाल्यास त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्याचे अधिकार दिले आहेत. या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे एका तुरुंग अधिका-याने सांगितले.